एकदा


एकदा तिच्या संगे मी पावसात भिजलो होतो
बेलगाम आवेगाच्या वादळात घुसलो होतो

वादळात घुसल्यावरती वाढले पुराचे पाणी
कळले न कधी लाटांनी मी पूरा वेढलो होतो
वेढताच मज लाटानी अदृश्य किनारे ज़ाले
बुड्ल्यावर लोक म्हणाले मी खोल उतरलो होतो

उतरलो खोल होतोच जगण्याचा ठाव बघाया
फ़ेकुन मुखवटे सारे नागवा जाहलो होतो

नागवेपणाचे ओज़े पेलवले नाही जेव्हा
लाजेच्या निकडीसाठी वस्त्रात अडकलो होतो

वस्त्रात अडकल्यावरती लपवित गेलो सारे
वाटेल जगाला तेव्हा मी सुन्दर सजलो होतो

सजल्यावर स्वागत होते कळताच सभ्यता शिकलो
पोषाखी अस्तित्वाच्या गर्दित हरवलो होतो

हरवलो असा कि पाउस नकोसा होतो
तो धुवाधार येताना खिडकीशी थिजलो होतो

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट