तुमचं दु:ख खरं आहे....
तुमचं दु : ख खरं आहे .... कळतं मला , शपथ सांगतो , तुमच्याइतकंच छळतं मला ; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं , आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं . सूर तर आहेतच ; आपण फक्त झुलायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत ? डोळे उघडून पहा तरी ; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत ! हिरव्या रानात , पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं ! मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं , दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं ! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं . आपण असतो आपली धून , गात रहा ; आपण असतो आपला पाऊस , न्हात रहा . झुळझुळणार् या झर् याला मनापासून ताल द्या ; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या ! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं , मन मोकळं , अगदी मोकळं करायचं , पाखरू होऊन पाखराशी बोलायचं .