मागे वळून पाहताना...........

मागे वळून पाहताना
कधी कधी भीति वाटते,
दुखावणारी एखादी
आठवण समोर येते
-- --
अनोळखी वाटेवर चालताना
कुणी ओळखीचं भेटतं,
ओळख न दाखवताच
पुढे गेल्यागत वाटतं
-- --
एकटं पडू नये म्हणून
वाटलं कुणाचा हात धरावा,
त्यानं मात्र निमित्त सांगून
शिताफीनं सोडवून घ्यावा
-- --
मजा असेल एकटं बसण्यात
असं वाटून गेलो नदीकाठी,
भोवताली फक्त निसर्ग होता
पण सुटेनात मनातल्या गाठी
-- --
जगातलं कमावण्याजोगं
सगळं काही असतं हाती,
तरी मुठीत वाळू पकडताना
पुनः का होते आपली मूठ रिती?

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट