अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !


मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट